पोटच्या १४ दिवसांच्या चिमुरडीला विष पाजून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम पित्याला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील उक्कड ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, उक्कड येथील रहिवासी शीला या बाळंतपणासाठी आपल्या माहेरी होत्या. त्यांना मुलगी झाल्याचा राग मनात धरून त्यांचा पती भीमराय भानप्पा चिप्पाडी याने पोटच्या गोळ्याची हत्या केली. प्रियांका असे मृत मुलीचे नाव असून ती केवळ १४ दिवसांची होती. मुलाला पाहण्याच्या बहाण्याने भीमरायने तिला जवळ घेतले आणि तिच्या तोंडात विष टाकले. भीमराय तिथून निघून गेल्यानंतर काही वेळातच चिमुरडीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.
या क्रूर कृत्याबाबत काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. केवळ १४ दिवसांच्या निष्पाप जिवाचा बळी घेणाऱ्या भीमरायला कायद्याने कठोर आणि कडक शिक्षा झाली पाहिजे, असे उक्कड ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबतच जिल्हा पोलीस प्रमुखांनाही स्वतंत्र निवेदन दिले आहे. अशा नराधमांना समाजात स्थान नसून न्यायालयाने त्याला कोणत्याही कारणास्तव जामीन मंजूर करू नये, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी तीव्र भावना उक्कड ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.


Recent Comments