बागलकोट लोकसभा मतदारसंघात नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली असून भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा उठवण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आक्रमक रणनीती आखली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने आता रिसॉर्ट पॉलिटिक्सचा अवलंब केला आहे.


बागलकोट जिल्ह्यामध्ये भाजप नेत्यांमधील शीतयुद्ध आता उघडपणे समोर आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून बसनगौडा पाटील यत्नाळ झंझावाती प्रचार करत असताना, त्यांच्या टीकेमुळे नाराज झालेले प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी प्रचारातून पूर्णपणे माघार घेतली आहे. विजयेंद्र यांनी फिरवलेली पाठ आणि नेत्यांमधील हा कलह भाजपसाठी चिंतेचा विषय ठरला असून, याचा थेट फायदा काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपमधील या विसंवादाचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे पुत्र यतींद्र यांनी बागलकोटमध्येच तळ ठोकला आहे. सिद्धरामय्या यांनी कंठी रिसॉर्टमध्ये पंचमसाली आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली असून, या समाजाची मते निश्चित करण्यासाठी कडक योजना आखली आहे. उमेदवार उमेश मेटी यांच्या समर्थनार्थ लिंगायत मतांचे एकत्रीकरण करण्याची ही खेळी भाजपची विजयाची गणिते बिघडवू शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले.


Recent Comments