तृतीयपंथीयांची ओळख पटवण्यासाठी वैद्यकीय चाचणी अनिवार्य करण्याच्या नव्या विधेयकाचा निषेध करण्यासाठी आज बेळगावमध्ये ‘समस्त बेळगाव तृतीयपंथीय आणि लैंगिक अल्पसंख्याक चळवळी’च्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या आंदोलकांनी सदर विधेयक त्वरित मागे घेण्याची मागणी केली. तृतीयपंथीयांची ओळख ठरवण्यासाठी वैद्यकीय चाचणीची अट घालणे हा अन्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांऐवजी शिरस्तेदार आल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. वारंवार विनंती करूनही जिल्हाधिकारी वेळ देत नसल्याने, आपल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रशासकीय अनास्थेचा निषेध केला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः चर्चा करावी, असा आक्रमक पवित्रा घेतला.
यावेळी ‘शक्ती’ योजनेअंतर्गत बसमध्ये आधार कार्ड दाखवूनही मोफत प्रवासाची सवलत नाकारली जात असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. ओळख पटवण्यासाठी लादलेली वैद्यकीय चाचणीची अट त्वरित रद्द करून आम्हाला सन्मानाने जगू द्यावे, अशी आक्रमक मागणी तृतीयपंथीयांनी यावेळी लावून धरली.
या आंदोलनात समस्त बेळगाव तृतीयपंथीय आणि लैंगिक अल्पसंख्याक चळवळीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments