Bailahongala

बैलहोंगलमध्ये पती-पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील अरवळ्ळी गावामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नियतीच्या खेळामुळे एकाच दिवशी पती आणि पत्नीचा मृत्यू झाला असून संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बैलहोंगल मधील अवरळ्ळी येथील रहिवासी मधुरा करेप्पा मादर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. या आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. मधुरा यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले असून नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.

पत्नीने विष प्राशन केल्याचे समजताच पती करेप्पा गंगाप्पा मादर हे तातडीने दुचाकीवरून रुग्णालयाकडे निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला आणि करेप्पा यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या निधनाचे वृत्त ऐकून रुग्णालयाकडे धावणाऱ्या पतीचाही अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

करेप्पा आणि मधुरा यांच्या ९ वर्षांच्या सुखी संसारामध्ये एक मुलगी आणि दोन मुले आहेत. अवघ्या काही तासांत आई आणि वडील या दोघांचेही छत्र हरपल्यामुळे ही तीन चिमुकली मुले आता अनाथ झाली आहेत. या मुलांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.

बैलहोंगल पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन प्रकरणाची नोंद केली आहे. एकाच वेळी आई-वडिलांना गमावलेल्या या अनाथ मुलांचे सांत्वन करताना संपूर्ण गाव हळहळत आहे.

Tags: