State

अस्तित्व टिकवण्यासाठीच देवेगौडा-कुमारस्वामी भाजपच्या आश्रयाला; मुख्यमंत्री

Share

दावणगेरे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजप आणि जेडीएसवर जोरदार टीका केली. भाजप हा संविधानविरोधी आणि लोकहित धाब्यावर बसवणारा पक्ष असून, केवळ धर्म आणि जातीच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे.

भाजप हा केवळ धर्म आणि जातीच्या नावावर समाजात फूट पाडणारा आणि संविधानविरोधी पक्ष असून, गेल्या नऊ वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी कर्नाटकासाठी काहीही ठोस केलेले नाही, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. केवळ आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी एच. डी. देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी भाजपशी हातमिळवणी केली असून, यापूर्वी याच पिता-पुत्रांनी भाजपवर केलेल्या टीकेचा विसर पडला आहे का, असा सवालही त्यांनी विचारला. काँग्रेस पक्षाने राबवलेल्या गॅरंटी योजनांवर जनतेचा पूर्ण विश्वास असून, आगामी निवडणुकीत आमचा शंभर टक्के विजय होईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.

कुटुंबवादावरून टीका करणाऱ्या एच. डी. कुमारस्वामी यांचा समाचार घेताना सिद्धरामय्या म्हणाले की, ज्यांच्या पक्षात वडील, मुले, नातू आणि दोन्ही सुना सक्रिय आहेत, त्यांनी आम्हाला शिकवण देऊ नये. मी जेव्हा जेडीएसचा प्रदेशाध्यक्ष होतो तेव्हा ५९ जागा जिंकल्या होत्या, मात्र तेव्हापासून आजपर्यंत जेडीएसची सातत्याने घसरण होत आहे. औद्योगिक क्षेत्राच्या घसरणीबाबत कुमारस्वामींनी केलेले आरोप फेटाळून लावताना, ज्याला मिळालेली संधी नीट वापरता येत नाही तो कसला शूर, अशा मार्मिक शब्दांत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी टोला लगावला.

Tags: