काँग्रेस पक्ष मुस्लिम तुष्टीकरण करत असल्याच्या भाजपच्या आरोपांना अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपकडे सध्या टीका करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम उरलेले नाही आणि ते केवळ हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करत असल्याची टीका सवदी यांनी केली.

अथणीमध्ये पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण सवदी यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपकडे सध्या केवळ आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम उरलेले नसून, ते फक्त हिंदुत्वाच्या गप्पा मारतात, अशा शब्दांत लक्ष्मण सवदी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. संविधानानुसार सर्व नागरिक समान असताना भाजप मुस्लिमांना का विरोध करत आहे, असा सवाल उपस्थित करत काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.
आर. अशोक यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना सवदी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी तांदूळ योजनेचे श्रेय कधीही स्वतःकडे घेतलेले नाही, तर केंद्राच्या ५ किलो तांदळासोबत राज्य सरकार अतिरिक्त ५ किलो तांदूळ देत असल्याचे स्पष्ट केले आहे. आर. अशोक यांची स्मरणशक्ती कमी झाल्यामुळेच ते अशी विधाने करत आहेत, असा खोचक टोलाही लक्ष्मण सवदी यांनी लगावला.


Recent Comments