रामनगर-नागराळी मुख्य रस्त्यावरून प्लायवूड घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला भीषण आग लागल्याने लाखो रुपयांच्या साहित्यासह ट्रक पूर्णपणे खाक झाला आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे रस्त्यावर काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

नागराळी आणि रामनगरला जोडणाऱ्या रस्त्यावर प्लायवूडचा साठा घेऊन जाणाऱ्या या ट्रकला अचानक ठिणगी लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. ट्रकमध्ये प्लायवूड असल्याने आगीची तीव्रता वेगाने वाढली. याच दरम्यान ट्रकच्या डिझेल टाकीचा मोठा स्फोट झाल्याने आगीने संपूर्ण ट्रकला वेढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पहाटेपर्यंत प्रयत्न करूनही ट्रक वाचवता आला नाही.
या आगीत ट्रकमधील मालासह संपूर्ण वाहन जळून कोळसा झाले आहे. सुदैवाने, आग लागल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखून ट्रकमधून बाहेर उड्या घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.


Recent Comments