Belagavi

बेळगावमध्ये ऐतिहासिक ऑलिव्ह ग्रीन्स गोल्फ लीगचा उत्साह; रविवारी रंगणार अंतिम सामना

Share

बेळगावमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली ‘ऑलिव्ह ग्रीन्स गोल्फ लीग’ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आठ संघांमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेची उपांत्य फेरी आज पार पडत असून रविवारी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

बेळगावमधील ऑलिव्ह ग्रीन्स गोल्फ मैदानावर ‘ओजीजीएल’चा पहिला हंगाम आयोजित करण्यात आला आहे. २१ मार्च रोजी सुरू झालेल्या या लीगमध्ये मिहीर पोतदार इलेव्हन, डायनॅमिक्स सिल्व्हर बिल स्टार्स, रॉयल किंग्स, क्लाउड ९ टायगर्स, एसबीजी वॉरियर्स, युनिव्हर्सल ईगल्स, आदित्य एलिट चॅम्पियन्स आणि दि मास्टर्स हे संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघात ८ मुख्य खेळाडू आणि राखीव खेळाडूंचा समावेश असून एकूण १०० हून अधिक खेळाडू या स्पर्धेत भाग घेत आहेत.

या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंचा समान सहभाग हे मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे. स्पर्धेचे पहिले दोन टप्पे पूर्ण झाले असून आज तिसऱ्या फेरीसह निर्णायक उपांत्य फेरीचे सामने पार पडत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने गोल्फ प्रेमींची मैदानावर मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे.

बेळगावमधील या विशेष क्रीडा उपक्रमासाठी ब्रिगेडियर एच. यू. मराठे, अभय कुलकर्णी, सुषमा भट्ट, हरीश गुलबानी आणि हवालदार शांताराम यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाडूंमधील चुरस पाहता रविवारी होणारा अंतिम सामना चुरशीचा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Tags: