Belagavi

२०२८ मध्ये अल्पसंख्याकांना अधिक प्राधान्य मिळणार; आमदार आसिफ सेठ

Share

दावणगेरे आणि बागलकोट पोटनिवडणुकीत अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी न मिळाल्याबाबत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी तिकीट वाटपावरून निर्माण झालेला संभ्रम दूर केला. ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समाज मोठ्या संख्येने आहे, तिथे उमेदवारीची मागणी होणे स्वाभाविक आहे. मात्र, एखाद्या आमदाराचे निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट देण्याची पक्षाची परंपरा आहे, असे आसिफ सेठ यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे मंत्री जमीर अहमद यांच्यासह कोणामध्येही नाराजी नसून काँग्रेसने कधीही अल्पसंख्याकांवर अन्याय केला नाही, अशी प्रतिक्रिया आसिफ सेठ यांनी व्यक्त केली.

जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, मध्यपूर्वेतील युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात काहीसा विलंब होत असला तरी तुटवडा नाही. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जातीचे राजकारण सोडून सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, कारण जातीचे राजकारण देशाला विनाशाकडे नेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आमदार यत्नाळांनी सर्वांना सोबत घेऊन काम केल्यास ते देशाचे मोठे नेते बनू शकतात, असे आसिफ सेठ यांनी नमूद केले. बेळगावमधील आमदारांना मंत्रिपद मिळण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर, मंत्रिपदाची मागणी करणे चुकीचे नाही, असे सांगत आसिफ सेठ यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला.

Tags: