बागलकोट पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत आमदार बसनगौडा पाटील यत्नाळांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नेत्यांच्या उपस्थितीतच त्यांनी हे विधान केले.
बागलकोटमध्ये आयोजित पंचमसाली समुदायाच्या जाहीर सभेत बोलताना बसनगौडा पाटील यत्नाळांनी २०२८ च्या निवडणुकीबाबत भाष्य केले. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आपणच मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी कमी जागा असूनही काहींनी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण केले, त्याच धर्तीवर आपण मोठ्या संख्येने जागा जिंकून सत्ता स्थापन करू, असा विश्वास बसनगौडा पाटील यत्नाळांनी व्यक्त केला.
यावेळी मंचावर उपस्थित असलेले त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी मुरगेश निराणी यांच्या उपस्थितीवरूनही त्यांनी टिप्पणी केली. आपण कितीही वाद घातले तरी आता पक्षासाठी एकाच मंचावर आलो आहोत, त्यामुळे मतदारांनीही संघटित होऊन मतदान करावे, असे आवाहन बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले. यत्नाळ यांच्या या विधानावर मंचावरील मुरगेश निराणी, सीसी पाटील आणि अरविंद बेल्लद यांनी हसून दाद दिली. यत्नाळांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.


Recent Comments