बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथील ग्रामदैवत श्री कल्मेश्वर यात्रोत्सव ढोल-ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. गुलालाची उधळण आणि पारंपारिक वाद्यांच्या निनादात भक्तांनी भक्तीभावाने रथाचे दोर ओढले.
श्री कल्मेश्वर यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा रथोत्सव गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला. कडक उन्हाची तमा न बाळगता हजारो भाविकांनी रथोत्सवात सहभाग घेतला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीशैल शास्त्री हिरेमठ होते. त्यांनी जीवनात गुरूंचे महत्त्व आणि ईश्वरी नामाचे सामर्थ्य विशद केले.
यावेळी आयोजित आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमात होन्नीहाळचे श्री बसवराज देव यांचे प्रवचन पार पडले. भारत देश हा संस्कृती, आचार-विचार आणि सनातन परंपरेने नटलेला असून, आध्यात्मिक क्षेत्रात भारताचे स्थान जगात सर्वोच्च आहे, साधू-संतांच्या विचारांचे अनुकरण करून मानवी जीवन सार्थकी लावावे, असे प्रतिपादन श्री बसवराज देव यांनी केले.
यावेळी आंध्र प्रदेशातील कलमाठ अदोनीचे श्री गुरुसिद्ध देव यांनी मानवी मूल्यांवर प्रकाश टाकला. मनुष्य जन्म हा ईश्वराशी एकरूप होण्यासाठी आहे, त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने वागून अध्यात्माच्या जोडीने आपले जीवन सुंदर घडवावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्यात श्री कल्मेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष बसनागौडा हुंकरीपाटील, महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष देवण्णा बंगेन्नवर, वकील श्रीरंग कुलकर्णी, बसवराज अण्णिगेरी आणि पत्रकार भैरोबा कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ हेब्बाळी यांनी केले. प्रवचनानंतर तिगडी आणि सुळेभावी येथील भजनी मंडळांचा भजन कार्यक्रम पार पडला.
या मिरवणुकीत विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील सारवाड येथील चंद्रशेखर हुगार आणि संचाचे ‘शक्ती बाहुली नृत्य’ लक्षवेधी ठरले. तसेच रामदुर्गच्या शंकरम्मा मुगळी यांच्या नेतृत्वाखालील श्री शाकंभरी महिला मंडळाच्या ‘ढोल नृत्याने’ उपस्थितांची दाद मिळवली. या सोहळ्यात मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष, सर्व सदस्य आणि पुजारी सहभागी झाले होते.


Recent Comments