बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथील ग्रामदैवत श्री कल्मेश्वर यात्रोत्सव ढोल-ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. गुलालाची उधळण आणि पारंपारिक वाद्यांच्या निनादात भक्तांनी भक्तीभावाने रथाचे दोर ओढले.
श्री कल्मेश्वर यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा रथोत्सव गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला. कडक उन्हाची तमा न बाळगता हजारो भाविकांनी रथाचे दर्शन घेऊन देवाच्या कृपेचा लाभ घेतला. रथावर खारीक आणि बत्तासे अर्पण करून भाविकांनी आपली श्रद्धा व्यक्त केली.
कल्मेश्वर मंदिर आवारातून निघालेली ही मिरवणूक होसकेरी गल्ली, कम्मर गल्ली, लक्ष्मी गल्ली, वाडे गल्ली, हळकेरी गल्ली आणि घाटोळ गल्लीमार्गे बाजार गल्लीपर्यंत पोहोचली.
या मिरवणुकीत विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील सारवाड येथील चंद्रशेखर हुगार आणि संचाचे ‘शक्ती बाहुली नृत्य’ लक्षवेधी ठरले. तसेच रामदुर्गच्या शंकरम्मा मुगळी यांच्या नेतृत्वाखालील श्री शाकंभरी महिला मंडळाच्या ‘ढोल नृत्याने’ उपस्थितांची दाद मिळवली. या सोहळ्यात मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष, सर्व सदस्य आणि पुजारी सहभागी झाले होते.
गावात श्री कल्मेश्वर देवाची पालखी मिरवणूकही काढण्यात आली, त्यानंतर रथ पुन्हा मंदिरापर्यंत नेण्यात आला. परंपरेनुसार ‘आंबील गाडे’ काढण्यात आले होते. तसेच ‘संग्या-बाळ्या’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.


Recent Comments