Belagavi

तथाकथित कन्नड कार्यकर्त्यांची मराठी वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या विरोधात गरळ

Share

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मराठी वृत्तपत्रे आणि पत्रकारांविरुद्ध निंदनीय मागणी करत हैदोस घातला. दरम्यान, आंदोलनावेळी प्रशासनाला वेठीला धरणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बेळगावमध्ये कर्नाटक राज्याच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा खोटा आरोप करत, येथील मराठी पत्रकारांना हद्दपार करावे या मागणीसाठी गुरुवारी राणी चन्नम्मा चौकात कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी मराठी प्रसार माध्यमांच्या विरोधात घोषणाबाजी करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला.

बेळगावात मराठी पत्रकारांकडून देशद्रोही कृत्य होत असल्याचा जावईशोध लावत, या पत्रकारांना मिळणाऱ्या सरकारी सवलती त्वरित काढून घ्याव्यात, अशी मागणी या संघटनांनी केली. भाषिक सलोखा बिघडवण्याचे काम करणाऱ्या या आंदोलकांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना करवे शिवरामगौडा गटाचे जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकुडी यांनी गरळ ओकली. बेळगावातून मराठी वृत्तपत्रे हद्दपार झाली पाहिजेत, कारण ती कन्नडिगांचा अपमान करत आहेत, असे बेताल वक्तव्य त्यांनी केले. मराठी पत्रकारांना सीमाभागातून हाकलून दिले नाही, तर उग्र आंदोलन करू, अशी वल्गनाही त्यांनी केली. तसेच बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव महानगरपालिकेने मंजूर करावा, अशी मागणी करत शांतात बिघडविण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला.

आंदोलकांनी यासंदर्भात महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांना निवेदन सादर केले. यावेळी महापौरांनी नियमांच्या चौकटीत राहून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सांगत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

राणी चन्नम्मा चौकात आंदोलकांनी गोंधळ घालत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये कोंडले, ज्यामुळे आंदोलनाचा फज्जा उडाला. मूठभर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाला वेठीला धरण्याचा प्रयत्न करण्यात आला असून शांतता बिघडवून भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या कन्नड संघटनांच्या अशा कार्यकर्त्यांवरच कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी आता होत आहे.

Tags: