बेळगाव शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी केले.

गुरुवारी बेळगावमधील नरगुंदकर भावे चौक येथे महानगरपालिकेच्या वतीने ‘जागतिक जल दिन’ आणि ‘प्लास्टिकमुक्त बेळगाव’ जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘कापडी पिशव्यांच्या व्हेंडिंग मशीन’चे उद्घाटन करण्यात आले. “स्वच्छता कर्मचारी स्वतःच्या घराप्रमाणे शहराची सफाई करतात. आपण त्यांना साथ दिली नाही, तर प्लास्टिकमुक्त समाज घडवणे अशक्य आहे. आपण नकळत पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत, जो थांबवणे काळाची गरज आहे,” असे न्यायाधीश नायक यांनी यावेळी नमूद केले.

महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. “प्लास्टिकचा वापर पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यासाठीही धोकादायक आहे. माती आणि पाण्यावाटे शरीरात जाणारे ‘मायक्रो प्लास्टिक’ कॅन्सर आणि वंध्यत्वासारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे प्लास्टिकचा त्याग करून पर्यावरणापूरक वस्तूंचा वापर करा,” असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी , माजी महापौर मंगेश पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वाढत्या प्लास्टिक वापरामुळे भविष्यात शुद्ध पाणी आणि हवेसाठी मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


Recent Comments