विजापूर जिल्ह्यातील बसवण बागेवाडी शहरात एका अज्ञात तरुणाने झोपलेल्या व्यक्तीवर कपड्यात दगड गुंडाळून निर्घृण हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मादेश इटगी नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील डॉक्टर आंबेडकर चौकाजवळ असलेल्या एका दुकानासमोर मादेश इटगी झोपला होता. यावेळी तिथे आलेल्या एका अज्ञात तरुणाने टॉवेलमध्ये दगड बांधून मादेशच्या चेहऱ्यावर अचानक प्रहार करण्यास सुरुवात केली. ही सर्व धक्कादायक घटना दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या भीषण हल्ल्यामुळे मादेशच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्याला तातडीने उपचारासाठी विजापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मादेशची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
बसवण बागेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, आरोपीने नशेच्या धुंदीत हे कृत्य केले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


Recent Comments