State

गॅरंटी योजनांच्या निधीवरून भाजपचा अपप्रचार अपयशी : मुख्यमंत्री

Share

दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळणारा प्रतिसाद ऐतिहासिक असून, भाजपने चार वर्षांत राज्याची लूट केल्याचे सत्य आता जनतेला उमजले आहे, अशी टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.

दावणगेरे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, गॅरंटी योजनांवरून भाजपने कितीही खोटा प्रचार केला तरी या योजनांसाठी ५२ हजार कोटींची तरतूद असून आतापर्यंत १ लाख ३१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, केंद्राने जीएसटी परतावा आणि विशेष अनुदाने रोखल्यामुळे राज्याच्या तिजोरीला १० हजार कोटींचा फटका बसला आहे. बिहार निवडणुकीसाठी जीएसटी दरात कपात केल्याने राज्याचे महसुली उत्पन्न घटले आहे, असा आरोप त्यांनी केला.

कर्जाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्याचे कर्ज मर्यादेत असून ते जीडीपीच्या २५ टक्क्यांच्या आत आहे. भाजपच्या काळात ५ लाख ३० हजार कोटींचे कर्ज झाले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कंत्राटदारांच्या थकबाकीबाबत माहिती देताना, प्रलंबित २९ हजार कोटींपैकी २४ हजार कोटींची देणी आमच्या सरकारने अदा केली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, यंदा ५६ हजार ४३२ रिक्त पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.

Tags: