Belagavi

बेळगावमध्ये रिक्षाचालकांना गॅस टंचाईची झळ

Share

बेळगाव शहरात रिक्षांसाठी लागणाऱ्या गॅसचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून हजारो रिक्षाचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शहरात आवश्यक प्रमाणात गॅस उपलब्ध होत नसल्याने चालकांना इंधनासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.

शहरातील आरटीओ चौकाजवळील शिल्पा गो गॅस पंपावर ‘नो स्टॉक’चा फलक लावण्यात आल्याने रिक्षाचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ याच पंपावर नाही, तर शहरातील अनेक गॅस पंपांवर अशीच परिस्थिती असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.

शहरात गॅसचा तुटवडा नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात पंपांवर गॅस उपलब्ध नसल्याने प्रशासनाचा दावा खोटा असल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. गॅस टंचाईचा गैरफायदा घेत काही पंपांवर दरवाढ करण्यात आल्याने रोजंदारीवर जगणाऱ्या चालकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

बेळगाव शहरात एकूण सहा गॅस पंप कार्यान्वित असूनही नियोजनाअभावी त्यांचा लाभ चालकांना मिळत नाही. केवळ एक-दोन पंपांवरच अवलंबून राहावे लागत असल्याने गोंधळ आणि रांगा वाढत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी चालकांनी केली आहे.

गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत, तर रिक्षाचालक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा रिक्षा संघटनांनी दिला आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Tags: