बेळगावमधील विशेष पॉक्सो न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षांच्या सक्तमजुरीची कठोर शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात न्यायालयाने पीडितेच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदतीचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
कुलगोड पोलीस ठाण्यातील तक्रारीनुसार, राजू भीमप्पा दोड्डभीमप्पागोळ याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद बी यांनी या प्रकरणाचा तपास केला, तर पोलीस निरीक्षक श्रीशैल ब्याकोड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायाधीश सी एम पुष्पलता यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान ९ साक्षीदार आणि ५२ पुराव्यांच्या आधारे आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाले.
न्यायालयाने आरोपीला ३० वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपये दंड सुनावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त २ वर्षांच्या शिक्षेचे निर्देश दिले आहेत. तसेच पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायाधीश सी एम पुष्पलता यांनी दिले. ही रक्कम बँकेत ५ वर्षांच्या मुदत ठेवीत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील एल व्ही पाटील यांनी काम पाहिले.


Recent Comments