Bagalkot

बागलकोटच्या पोटनिवडणुकीत यत्नाळ यांची आक्रमक एन्ट्री

Share

बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीचा आखाडा आता हायव्होल्टेज झाला आहे. भाजपमधून हकालपट्टी झाल्यानंतर पहिल्यांदाच फायरब्रँड नेते बसवनगौडा पाटील यत्नाळ हे भाजप उमेदवार वीरणा चंरतीमठ यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत.

कोणत्याही पक्षाचा मफलर किंवा बॅनर नसलेल्या व्यासपीठावरून यत्नाळ यांनी ही सभा घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. बागलकोटमधील बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या सभागृहात पंचमसाली समाजाच्या नेत्यांची महत्त्वाची प्रचार सभा पार पडली. या सभेत यत्नाळ यांनी कोणत्याही पक्षीय चिन्हाचा वापर न करता भाजप उमेदवारासाठी जोरदार बॅटिंग केली. यत्नाळ यांचा वैयक्तिक प्रभाव पाहता राज्य भाजप नेत्यांनीही त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे दिसून आले. या सभेमुळे निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या सभेत भाजप उपाध्यक्ष मुरुगेश निराणी, माजी मंत्री सी.सी. पाटील, प्रभाकर कोरे, अरविंद बेल्लद, आमदार सिद्धू सवदी आणि जेडीएस जिल्हाध्यक्ष हनुमंत मावीनमरद यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र, ज्येष्ठ नेते गोविंद कारजोळ यांची अनुपस्थिती यावेळी चर्चेचा विषय ठरली. यत्नाळ यांची ही रणनीती भाजपचा विजय सुकर करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: