Dharwad

धारवाडमधील टोळीयुद्धात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Share

धारवाड तालुक्यातील चिक्कमल्लीगवाड येथे २२ मार्च रोजी दोन गटांत झालेल्या हिंसक संघर्षात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. गेल्या नऊ दिवसांपासून हुबळीच्या किम्स रुग्णालयात कोमात असलेल्या या तरुणाने उपचारादरम्यान प्राण सोडले.

धारवाडमधील चिक्कमल्लीगवाड परिसरात झालेल्या दोन गटांच्या राड्याने आता एका तरुणाचा बळी घेतला आहे. सायबाज असे मृत तरुणाचे नाव असून, तो आणि त्याचा मित्र आफाक आपल्या इतर सहकाऱ्यांसह एका रिसॉर्टवर पोहायला गेले होते. तिथे किरकोळ कारणावरून वाद झाला होता, जो स्थानिकांनी मध्यस्थी करून सोडवला होता.

मात्र, सायबाज आणि आफाक आपल्या मित्रांसह घरी परतत असताना चिक्कमल्लीगवाड रस्त्यावर दुसऱ्या गटाने त्यांची दुचाकी अडवली. लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर एकाएकी भीषण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सायबाजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नऊ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली.

या प्राणघातक हल्ल्याचे संपूर्ण दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी उलवप्पा धारवाड, राजू कोरी, शिवप्पा कल्लोर, निंगप्पा नडुविनामनी आणि मुदकप्पा कडेमनी अशी आरोपींची नावे निष्पन्न केली असून, त्यांच्यावर धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबाजच्या मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: