विजापूरमध्ये तिथीच्या गोंधळावरून हनुमान जयंती दोन दिवस साजरी होत असून पहिल्या दिवशी मारुती मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. विविध मंदिरांमध्ये पाळणा सोहळा, रथोत्सव आणि अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

विजापूर शहरात हनुमान जयंती १ एप्रिलला की २ एप्रिलला असा गोंधळ निर्माण झाला असला तरी, काही ठिकाणी हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

यावर्षी रामभक्त हनुमानाची जयंती तिथीच्या फेऱ्यात अडकली आहे. यापूर्वी रामनवमीच्या वेळीही असाच गोंधळ पाहायला मिळाला होता. या गोंधळातही विजापूर जिल्ह्यातील आदर्श नगरमधील मंदिरात पहाटे ५:३० वाजता बाल हनुमानाचा पाळणा सोहळा आणि जन्मोत्सव पार पडला. यावेळी पालखी मिरवणूक तसेच रथोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या वेळी भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.
तिथीच्या गोंधळामुळे विजापूर जिल्ह्यातील काही भागात उद्याही जयंती साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र महिन्याची पौर्णिमा १ एप्रिल रोजी सकाळी ७:०६ वाजता सुरू झाली असून ती २ एप्रिल रोजी सकाळी ७:४१ वाजता समाप्त होईल. त्यामुळे हा उत्सव २ एप्रिल रोजी साजरा करणे शास्त्रोक्त असल्याचे मधला मारुती मंदिराचे पुजारी गोविंद जोशी यांनी सांगितले.
दुसरीकडे ज्या मंदिरांमध्ये आज जयंती साजरी झाली तिथल्या पुजाऱ्यांचे मत वेगळे आहे. हनुमान जन्मोत्सव हा दवण्याच्या म्हणजेच चैत्र पौर्णिमेला साजरा होतो आणि आज पूर्ण वेळ पौर्णिमेचा कालावधी आहे. उद्या केवळ काही घटिकाच पौर्णिमा असल्याने आजच जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे राघवेंद्र आचार्य यांनी स्पष्ट केले.
एकंदरीत तिथीच्या गोंधळातही भाविकांनी मारुतीरायाचा जयघोष करत जन्मोत्सव साजरा केला. ज्या ठिकाणी आज सोहळा झाला नाही तिथे उद्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.


Recent Comments