Belagavi

साखर कारखान्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बेळगावमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा

Share

साखर कारखान्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि गाळप प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी बेळगावमधील एस. निजलिंगाप्पा साखर संस्थेत दोन दिवसांच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कारखान्यांचे होणारे तांत्रिक नुकसान टाळता येईल, असा विश्वास या वेळी तज्ज्ञांनी व्यक्त केला.

बेळगावमधील एस. निजलिंगाप्पा साखर संस्थेत पुणे येथील राही कन्सल्टन्सीच्या सहकार्याने ‘ट्रेनिंग प्रोग्राम ऑन मिल सेटिंग अँड मिल मेंटेनन्स’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. साखर कारखान्यांमधील यंत्रणेची देखभाल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर यावर या वेळी सखोल चर्चा करण्यात आली.

साखर कारखान्यांमध्ये मिल सेटिंग आणि मिल मेंटेनन्सच्या नवीन तंत्रांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. या विषयावर सविस्तर प्रशिक्षण घेतल्यास कारखान्यांची कार्यक्षमता वाढून संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येईल, असे संस्थेचे संचालक राजगोपाल यांनी अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत तांत्रिक सल्लागार सी. बी. पाटील यांनी साखर तंत्रज्ञानातील बदलांची माहिती दिली. राही कन्सल्टन्सीचे तज्ज्ञ किरण बी. काळे आणि रमाकांत कुलकर्णी यांनी शिबिरार्थींना कारखान्यातील तांत्रिक समस्या आणि त्यावरील उपायांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यंत्रणेत बिघाड झाल्यास तो तातडीने कसा दुरुस्त करावा, यावर त्यांनी तांत्रिक सल्ला दिला.

साखर तंत्रज्ञ शंकर धर्मट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. या कार्यशाळेत कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील विविध साखर कारखान्यांचे ६० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: