मध्यपूर्वेतील देशांमधील युद्धाचा थेट परिणाम आता बेळगावमधील रिक्षाचालकांवर होत असून, सीएनजी संपल्यामुळे भररस्त्यात रिक्षा ढकलत गॅस स्टेशनपर्यंत नेण्याची वेळ चालकांवर आली आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही इंधन मिळत नसल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत.

इराण-इस्रायल युद्धाचा फटका बेळगावलाही बसला असून सीएनजी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. आधीच ‘शक्ती’ योजनेमुळे प्रवासी मिळत नसल्याने अडचणीत असलेल्या रिक्षाचालकांसाठी आता इंधन टंचाई ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. शहरातील बहुतांश सीएनजी पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक झळकत आहेत, तर जिथे गॅस उपलब्ध आहे तिथे अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
इंधन संपल्यामुळे रस्त्यातच रिक्षा बंद पडत असल्याने चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सीएनजी स्टेशनसमोर लागलेल्या रिक्षांच्या किलोमीटर लांब रांगा या समस्येची भीषणता दर्शवत आहेत. भाजी मार्केटमधून भाजीपाला घेऊन जात असताना कोल्हापूर सर्कलजवळ रिक्षामधील सीएनजी संपला आणि तिथून रिक्षा ओढत आणावी लागली, अशी व्यथा एका चालकाने मांडली. सीएनजीअभावी रिक्षाचालकांचे जगणे कठीण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील चार सीएनजी स्टेशन्सवर गॅस उपलब्ध नाही, केवळ आरटीओ सर्कल येथील ‘गो गॅस’वर सीएनजी मिळत आहे. त्यामुळे इंधन संपलेल्या ठिकाणाहून रिक्षा ढकलत इथपर्यंत आणाव्या लागत आहेत. रिक्षा बंद राहिल्यास आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, असे रिक्षाचालकांनी स्पष्ट केले.
बेळगावमधील मंत्री आणि आमदारांनी सामान्य जनतेच्या या समस्या सरकार दरबारी मांडून त्या सोडवाव्यात, अशी विनंती रिक्षाचालकांनी केली आहे. मध्यपूर्वेतील युद्धाचे सावट दूर होऊन लवकरच शांतता प्रस्थापित व्हावी आणि जनजीवन सुरळीत व्हावे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.


Recent Comments