M K HUBLI

एम. के. हुबळीमध्ये टपाल कार्यालय स्थलांतरावरून महिला आक्रमक

Share

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखाना आवारातील उप टपाल कार्यालय अचानक स्थलांतरित करण्याच्या निर्णयावरून महिलांनी रौद्रावतार धारण करत जोरदार निदर्शने केली.

एम. के. हुबळी येथील साखर कारखाना आवारात गेल्या ५० वर्षांपासून हे उप टपाल कार्यालय कार्यरत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हे कार्यालय अचानक हलवण्यात येत असल्याचा आरोप करत शेकडो महिलांनी कार्यालयासमोर जमा होऊन टाळेबंदी केली. या साखर कारखान्यातील कामगार आणि स्थानिक महिलांची मोठी बचत खाती याच कार्यालयात असून, लेखी किंवा तोंडी माहिती न देता हा निर्णय घेतल्याने महिलांनी संताप व्यक्त केला.

कारखाना आवारात कार्यालय असल्याने व्यवहार करणे सोयीचे होते, मात्र आता हे कार्यालय लांबच्या ठिकाणी हलवल्यास ग्रामीण भागातील महिला आणि वृद्धांना मोठा त्रास होईल, असे आंदोलक महिलांनी सांगितले. जर कार्यालय हलवायचेच असेल तर आधी आमची सर्व खाती बंद करून आमचे पैसे आम्हाला परत करा, त्यानंतरच कार्यालय घेऊन जा, असा पवित्रा महिलांनी घेतला.

आंदोलनात सहभागी झालेल्या नंदा सामणे यांनी आमचे पैसे मिळाल्याशिवाय कार्यालय हलू देणार नाही, असा इशारा दिला. तर जयश्री तुक्कपन्नवर यांनी स्थलांतरामुळे दैनंदिन व्यवहारांवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली.

यावेळी राणी शुगर कारखान्याचे एसओ पुंडलिक यांनी व्यवस्थापकीय संचालकांच्या (एमडी) सूचनेनुसार कार्यालयाचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला असता, महिलांसोबत त्यांची जोरदार शाब्दिक चकमक झाली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आपला निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

Tags: