बेळगावमधील शिवबसवनगर येथील जागृत देवस्थान श्री जोतिबा मंदिरात बुधवारी चैत्र पौर्णिमा यात्रोत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली असून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

शिवबसवनगरमधील जोतिबा मंदिरात सकाळी ६ वाजता अभिषेक, पाद्यपूजा आणि अलंकार पूजा संपन्न झाली. चैत्र पौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून रात्री ८ वाजता महाआरती आणि दीपप्रज्वलनाचा सोहळा पार पडणार आहे. मंदिर समितीने या आध्यात्मिक उत्सवात सर्व भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूर येथील मुख्य जोतिबा यात्रेला जे भाविक जाऊ शकले नाहीत, त्यांनी बेळगावमधील या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. येत्या सोमवारी ६ एप्रिल रोजी कोल्हापूरला गेलेल्या मानाच्या सासनकाठीचे मंदिरात आगमन होणार असून त्यानिमित्त दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे शिवबसवनगरमध्ये चैत्र यात्रा उत्साहात साजरी होत असून आज पौर्णिमेच्या मुख्य दिवशी देवाला दवणा अर्पण करून पूजा करण्यात आली, असे अमर येळ्ळूरकर यांनी सांगितले. ६ एप्रिल रोजी सासनकाठीचे आगमन आणि महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा, असे आवाहन अमर येळ्ळूरकर यांनी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने केले आहे.


Recent Comments