बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी लोकहितासाठी झटणाऱ्या व्यक्तींचे आणि त्यांच्या आदर्श कामांचे नेहमीच स्मरण ठेवले पाहिजे, असे आवाहन केले आहे. बेळगावमधील हनुमान नगर रहिवासी कल्याण संघाच्या उद्घाटन समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

हनुमान नगरमधील ‘ग्लास हाऊस’ परिसरात सोमवारी हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बेळगाव महापालिकेच्या महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाळी, नगरसेवक संदीप जिरीगाळ आणि संघाचे अध्यक्ष एस. डी. सुलिगावी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान रहिवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या नऊ वर्षांपूर्वी बांधलेल्या जलतरण तलावातील तांत्रिक अडचणी मांडून त्या सोडवण्याची विनंती केली. यावर बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी माजी आमदार फिरोज सेठ यांच्या जनसेवेच्या वारशाचा उल्लेख केला. जनसेवेच्या ज्या मार्गावरून त्यांनी वाटचाल केली, त्याच मार्गावर आपण काम करत असल्याचे आसिफ सेठ यांनी म्हटले.
केवळ कचरा व्यवस्थापनच नव्हे, तर बगीचे, रस्ते, गटारी आणि पथदिवे यांसारख्या सर्व मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत. हनुमान नगरमधील जलतरण तलावाचा तांत्रिक दोष दूर करून त्याचे लवकरच लोकार्पण केले जाईल, अशी ग्वाही आसिफ सेठ यांनी दिली. विकासाच्या कामात कोणतेही राजकारण करणार नसून, जनतेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला हनुमान नगरमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments