सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला गती मिळावी, या मागणीसाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने भव्य ‘स्वाक्षरी अभियान’ हाती घेतले आहे.

रविवारी मराठा मंदिर येथे झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, लाखो सीमावासीयांच्या स्वाक्षऱ्या संकलित करून त्या सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारना सादर केल्या जाणार आहेत.
गेल्या २२ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नावर सातत्याने सुनावणी घेऊन या भागातील जनतेला तातडीने न्याय मिळावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार आनंद मेणसे यांनी या मोहिमेचे आवाहन करताना सांगितले की, देशातील अनेक सीमावाद सुटले आहेत, मात्र बेळगावचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. लोकशाही मार्गाने आपला हक्क मागण्यासाठी कोणालाही घाबरण्याची गरज नसून, निवृत्त न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्याशी चर्चा करून या स्वाक्षऱ्या न्यायालयात पोहोचवल्या जातील, असे प्रतिपादन आनंद मेणसे यांनी केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांची पहिली स्वाक्षरी घेऊन या अभियानाचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला. पत्रकारांच्या या उपक्रमामुळे सीमा लढ्याला नवी शक्ती मिळेल, असा विश्वास मनोहर किणेकर यांनी व्यक्त केला. तर माजी महापौर आणि पत्रकार नागेश सातेरी यांनी कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली.


Recent Comments