बेळगाव महापालिकेत महाजन अहवाल लादण्यासाठी कन्नड संघटना पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. प्रशासनावर दबाव निर्माण करून एप्रिलमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याच्या या भूमिकेमुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
ज्येष्ठ कन्नड कार्यकर्ते अशोक चंदरगी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत मराठी भाषिकांच्या विरोधातील महाजन अहवाल पुन्हा उकरून काढण्याचे ठरले. महापालिकेत महाजन अहवाल अंतिम असल्याचा ठराव मंजूर करण्यासाठी मंगळवारपासून महापौर आणि उपमहापौर हणमंत कोंगाळी यांना निवेदने देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. मात्र कन्नड संघटनांच्या या भूमिकेमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
बैठकीत राज्योत्सवाच्या ५० लाख रुपयांच्या निधीचा वापर आणि बेपत्ता असलेल्या ‘हल्मिडी शिलालेखा’च्या प्रतिकृतीची पुनर्स्थापना करण्याच्या नावाखाली प्रशासकीय दबाव वाढवण्यावर भर देण्यात आल्याचे अशोक चंदरगी यांनी म्हटले.
महापालिकेत कन्नड भाषेचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकमताने निर्णय झाल्याचे अशोक चंदरगी यांनी सांगितले.
या नव्या रणनीतीमुळे सीमाभागातील वातावरण तापण्याची शक्यता असतानाच, एप्रिलमध्ये मुख्यमंत्र्यांकडे धाव घेणार असल्याची माहिती महादेव तळवार यांनी दिली.
या बैठकीला कित्तूर कर्नाटक सेनेचे प्रदेशाध्यक्ष महादेव तळवार, गडिनाडू कन्नडिगा सेनेचे प्रदेशाध्यक्ष बलराम मानेनट्टी आणि करवेचे जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकोडी यांच्यासह विविध कन्नड संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments