Belagavi

बेळगावच्या कुमारस्वामी ले-आउटमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास

Share

बेळगाव शहरात पर्यावरणाला मोठा धक्का देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुमारस्वामी ले-आउटमधील एका खासगी जागेत मालकाच्या परवानगीशिवाय आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता मध्यरात्री लाखो रुपये किमतीच्या सागवानी झाडांची अवैध कत्तल करण्यात आली आहे.

शेतकरी मधु पाटील यांनी १९९० पासून आपल्या जागेत अत्यंत मेहनतीने सुमारे ७०० सागवानी झाडे लावली होती. ३६ वर्षांच्या परिश्रमातून वाढलेली ही झाडे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासोबतच मोठे आर्थिक मूल्यही राखून होती. मात्र, काही अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या जागेत रात्रीच्या वेळी बेकायदेशीर प्रवेश करून ९० हून अधिक मोठी झाडे तोडून नष्ट केली आहेत.

ही घटना केवळ आर्थिक नुकसान नसून पर्यावरणावर झालेला मोठा हल्ला असल्याची भावना पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असतानाही संबंधित वनविभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी केली आहे. या घटनेमागे शहरात सक्रिय असणारी एखादी अवैध वृक्षतोड करणारी टोळी असण्याची शक्यता मालक मधु पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Tags: