Belagavi

बेळगावमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक उत्साहात; भव्य शोभायात्रेने वेधले लक्ष

Share

बेळगावमध्ये आज भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने जैन धर्माचा संदेश देत सामाजिक जागृती केल्याचे पाहायला मिळाले.

बेळगावमध्ये जैन धर्मीयांच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. शहरातील टिळक चौक येथे मुख्य सोहळा पार पडला. यावेळी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाली, दक्षिणचे आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, नरेंद्र जैन, राजेंद्र जैन, शिवनगौडा पाटील आणि सुनील हणमण्णावर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत जैन ध्वजारोहण करून शोभायात्रेला प्रारंभ झाला.

व्यासपीठावरून बोलताना आमदार अभय पाटील यांनी गेल्या २८ वर्षांपासून नरेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावमध्ये जैन समाज एकजुटीने महावीर जयंती साजरी करत असल्याचे सांगितले. तरुणांनी भगवान महावीरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी या महोत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन अभय पाटील यांनी केले.

जैन समाज तन-मन-धनाने समृद्ध असून भेदभाव विसरून सर्वांशी मिळून मिसळून राहणारा आणि ‘अहिंसा परमो धर्म’ या शिकवणीतून इतरांच्या कल्याणाचा विचार करणारा हा समाज आहे, अशा शब्दांत अनिल बेनके यांनी जैन धर्माचे कौतुक केले.

जन्मोत्सवाचे आयोजक नरेंद्र जैन यांनी भगवान महावीरांच्या त्याग आणि बलिदानाचा संदेश देत, हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी श्रम घेण्याचे आवाहन केले.

या मिरवणुकीत जैन धर्माचा संदेश देणारे चित्ररथ, महिला व बालकांचे नृत्य आणि धर्मस्थळ संदर्भातील सत्य धर्माचा विजय दर्शविणारे रूपक अशा १०० हून अधिक चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ही शोभायात्रा टिळक चौकातून सुरू होऊन रामलिंगखिंड गल्ली, कुलकर्णी गल्ली, मठ गल्ली, कपिलेश्वर उड्डाणपूल, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रोड, शहापूर खडे बाजार या प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. शेवटी महावीर भवन येथे या यात्रेची सांगता झाली. यावेळी हजारो जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: