Raibag

रायबागमध्ये कारच्या धडकेत जखमी झालेल्या दुसऱ्या बहिणीचाही मृत्यू

Share

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मेखळी गावातील एका भीषण रस्ते अपघातात दोन चिमुरड्या सख्ख्या बहिणींचा बळी गेला आहे. शाळेतून घरी परतत असताना झालेल्या या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून कोटरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मेखळी गावातील रहिवासी असलेल्या ११ वर्षीय जनश्री कोटरे आणि १३ वर्षीय भाग्यश्री कोटरे या दोन बहिणी पाच दिवसांपूर्वी शाळेतून पायी घरी येत होत्या. यावेळी एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जनश्रीचा जागीच मृत्यू झाला होता, तर तिची मोठी बहीण भाग्यश्री बेळगावमधील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती.

दुर्दैवाने, पाच दिवसांच्या उपचारानंतर आज भाग्यश्रीची प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील दोन मुलींना अपघातात गमवावे लागल्याने आई-वडिलांचा आक्रोश काळजाला पिळवटून टाकणारा आहे. कार चालकाच्या बेदरकारपणामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

याप्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कार चालकाविरुद्ध तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांवर अंकुश ठेवण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Tags: