बागलकोट पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत चिकोडी येथे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सत्ताधारी काँग्रेस आणि स्वपक्षीय नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार प्रदीप ईश्वर यांच्या नावाचा उल्लेख होताच यत्नाळ यांचा पारा चढला आणि त्यांनी राज्य सरकारची तुलना थेट पाकिस्तानशी करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
चिकोडी शहरात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना यत्नाळ यांनी आमदार प्रदीप ईश्वर यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “तो एक बोगस ट्युशन चालवणारा माणूस आहे, अशा लोकांच्या बातम्या देऊन तुम्हीच त्यांना प्रसिद्धी देत आहात,” असे म्हणत त्यांनी माध्यमांवरही नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर बोलताना ते म्हणाले की, सिद्धरामय्या सरकार हे पाकिस्तानमधील सरकार असल्यासारखे वागत आहे. अर्थसंकल्पात केवळ एका विशिष्ट समुदायाला सुविधा दिल्या जात आहेत. कराटे प्रशिक्षण, पीएसआय ट्रेनिंग आणि उर्दू शाळांना दिला जाणारा अवाजवी प्रोत्साहन हे एका मुख्यमंत्र्यांना शोभणारे नाही. अशा प्रकारचे ‘पाकिस्तानी मॉडेल’ कर्नाटकसाठी दुर्दैवी आहे, असा घणाघात त्यांनी केला.
यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यावरही निशाणा साधला. “विजयेंद्र स्वतःला मोठे नेते समजत आहेत, पण त्यांचे वडील भ्रष्टाचार केल्याशिवाय तुरुंगात गेले होते का?” असा बोचरा सवाल त्यांनी केला. “कोणाचे हात-पाय धरून मी भाजपमध्ये राहणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी भ्रष्ट काँग्रेस आणि लांगूलचालन करणाऱ्या काँग्रेसला हरवणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगितले. चित्रदुर्ग येथील नियोजित कार्यक्रमाला त्यांनी ‘ब्लॅकमेल तंत्र’ संबोधले असून, लिंगायत समाज त्यांच्या पाठीशी नाही, असा दावाही यत्नाळ यांनी केला आहे.


Recent Comments