Belagavi

बेळगावात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली वृद्ध उद्योजकाची कोटींची फसवणूक

Share

बेळगावमध्ये सायबर गुन्हेगारीच्या इतिहासातील अत्यंत धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका वृद्ध उद्योजकाला ‘डिजिटल अरेस्ट’ करत १५ कोटींहून अधिक रुपयांना लुटण्यात आले आहे.

बेळगावमधील एका वृद्ध उद्योजकाला लक्ष्य करत सायबर चोरट्यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकल्याची भीती दाखवून तब्बल १५ कोटी ४५ लाख रुपये उकळले आहेत. सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव रचून व्हिडिओ कॉलद्वारे उद्योजकाला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली डांबून ठेवले आणि अटकेची भीती दाखवून ही रक्कम वर्ग करून घेतली. बेळगाव सायबर क्राईम पोलिसांनी तपास सुरू केला असता, लुटीची ही रक्कम देशातील विविध भागांतील सुमारे ३९० बँक खात्यांमध्ये अवघ्या काही मिनिटांत वळवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेकडो ‘म्युल अकाउंट्स’चा वापर करून चोरट्यांनी आधीच ९५ टक्के रक्कम काढून घेतली आहे.

या मोठ्या जाळ्याची साखळी पाहून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी सीआयडीला पत्र लिहिले आहे. सध्या पोलिसांनी ९० लाख रुपये गोठवण्यात (Freeze) यश मिळवले असून, उर्वरित रकमेसाठी ३९० खात्यांची माहिती गोळा केली जात आहे. कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही तरतूद नाही. कोणालाही असे फोन आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन भूषण बोरसे यांनी केले आहे.

हायटेक चोरट्यांच्या या चलाखीमुळे सध्या सीमावर्ती भागात मोठी खळबळ उडाली आहे.

Tags: