इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर इंधन तुटवड्याचे संकट गडद होत असताना, बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मात्र गोबर गॅसचा अवलंब करून इंधनाबाबत स्वयंपूर्णता मिळवली आहे.
जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे आगामी काळात घरगुती गॅसचे दर वाढण्याची आणि पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, बेळगाव तालुक्यातील कडोली आणि परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी या संकटावर मात करण्यासाठी पुन्हा एकदा गोबर गॅस यंत्रणेचा आधार घेतला आहे. दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या या भागातील शेतकऱ्यांनी पर्यावरणवादी शिवाजीराव कागणीकर यांच्या प्रेरणेतून ३० वर्षांपूर्वीच गोबर गॅस संयंत्रे बसवली होती. मधल्या काळात आधुनिकतेच्या ओघात अनेकांनी एलपीजी सिलिंडरचा वापर सुरू केला होता, मात्र आता सिलिंडरची वाढती किंमत आणि संभाव्य टंचाई लक्षात घेता शेतकरी पुन्हा जुन्या आणि खात्रीशीर गोबर गॅस पद्धतीकडे वळले आहेत.
आम्ही गेल्या ३० वर्षांपासून स्वयंपाकासाठी गोबर गॅसचा वापर करत होतो, मात्र नंतर एलपीजीच्या वापरामुळे ही यंत्रणा बंद पडली होती. आता गॅस टंचाईच्या भीतीमुळे आम्ही पुन्हा गोबर गॅस यंत्रणेची दुरुस्ती करून तिचा वापर सुरू केला आहे. केवळ एका टोपली शेणातून दिवसभराची इंधनाची गरज भागते आणि पैशांचीही बचत होते, अशी प्रतिक्रिया शांता चौगुले यांनी व्यक्त केली.
सुरुवातीला लाकडाचा वापर आणि त्यानंतर गोबर गॅसचा वापर केला जात असे. मधल्या काळात जनावरांची संख्या कमी झाल्याने लोक एलपीजीकडे वळले होते, मात्र आता पुन्हा लोक गोबर गॅसकडे वळत आहेत. हे पर्यावरणपूरक इंधन असून ग्रामीण भागात त्याचा प्रसार होत असल्याचे अप्पासाहेब देसाई यांनी म्हटले आहे.
सिलिंडर बुकिंगची कटकट नसलेली ही पर्यावरणपूरक इंधन व्यवस्था सध्या संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे. आधुनिक सुविधांच्या गर्दीतही स्वावलंबी जीवन कसे जगावे, हे कडोली भागातील शेतकऱ्यांनी देशाला दाखवून दिले आहे.


Recent Comments