बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवार उमेश मेटी यांच्या प्रचारासाठी युवा नेते राहुल जारकीहोळी मैदानात उतरले आहेत. सरकारच्या गॅरंटी योजना आणि मेटी कुटुंबाने केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी मतदारांकडे विजयाचा कौल मागितला आहे.
बागलकोट विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनिमित्त आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेत युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी उमेदवार उमेश मेटी यांच्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ज्येष्ठ नेते एच.वाय. मेटी यांच्याप्रमाणेच उमेश मेटी यांचाही स्थानिक जनतेशी दांडगा संपर्क आहे. जनतेच्या समस्यांना धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव असून मतदारसंघाचा विकास अखंड ठेवण्यासाठी त्यांना विजयी करण्याचे आवाहन राहुल जारकीहोळी यांनी केले.
यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. २०२३ मध्ये दिलेल्या सर्व गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यशस्वीपणे केली आहे. जात-पात न पाहता सर्व वर्गातील लोकांना या योजनांचा लाभ मिळत आहे. राज्यात अजून दोन वर्षे आमचेच सरकार असून भविष्यातही काँग्रेसच सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात अधिक विकासकामे व्हावीत यासाठी उमेश मेटी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन राहुल जारकीहोळी यांनी कार्यकर्त्यांना केले.


Recent Comments