विजापूर जिल्ह्यातील इंडी शहरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून, व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील वर्दळीच्या महावीर चौकात असलेल्या ‘प्रमोद ट्रेडर्स’ या दुकानात धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
विरेंद्र पांढरे यांच्या मालकीच्या या दुकानात शिरून चोरांनी ५ हजार रुपयांची रोकड आणि सुमारे ३ लाख रुपये किमतीचे सिगारेट व पान मसाल्याचे पाकीट लंपास केले. विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतर आपला सुगावा लागू नये, यासाठी चोरांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर (DVR) देखील सोबत नेला आहे. घटनेची माहिती मिळताच इंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
या चोरीमुळे दुकान मालकाने जुन्या वैमनस्यातून घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याच प्रमोद ट्रेडर्स दुकानाला तीन वर्षांपूर्वी अज्ञातांनी आग लावली होती, ज्यामध्ये ३० लाखांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा चोरी झाल्याने हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा संशय बळावला आहे. शहरात चोरीच्या घटना वाढल्याने चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. याप्रकरणी इंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Recent Comments