Belagavi

बेळगाव : हलगा गावात पारंपरिक ‘सासनकाठी’ उत्सवाचा उत्साह

Share

बेळगाव तालुक्यातील हलगा गावात पारंपरिक ‘सासनकाठी’ उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. गावातील प्रमुख गल्ल्यांमधून सासनकाठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून, शेकडो भाविक पायी चालत श्री जोतिबा डोंगराच्या दिशेने रवाना झाले आहेत.

बेळगाव तालुक्यातील हलगा गावातील संताजी आणि कामती बंधूंच्या ‘सासनकाठ्या’ श्री जोतिबा डोंगराकडे पायी यात्रेने निघाल्या आहेत. गावाचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मंदिरात सासनकाठ्यांचे आगमन झाल्यावर विशेष पूजा अर्चा करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रत्येक गल्लीत भाविकांनी सासनकाठ्यांचे भक्तिभावाने स्वागत केले. या पवित्र सासनकाठ्या येत्या सोमवारी जोतिबा डोंगरावर पोहोचतील, अशी माहिती भाविकांनी दिली आहे.

मिरवणुकीदरम्यान ‘श्री जोतिबा’ नावाचा जयघोष आणि गुलालाची उधळण करण्यात आली. या सोहळ्यात अबालवृद्धांसह संपूर्ण गाव सहभागी झाले होते. वृद्ध आणि तरुण खांद्यावर सासनकाठ्या घेऊन चालत होते, तर महिलांनी पूजा करून भक्ती अर्पण केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत श्रद्धापूर्वक ही पायी यात्रा काढण्यात आली असून, जोतिबा डोंगरावर सासनकाठ्या अर्पण करून भाविक आपला नवस फेडणार आहेत.

Tags: