Belagavi

मूडलगी: एसएसएलसी उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा; चक्क दुचाकीवरून केली पार्सलची वाहतूक!

Share

हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या एसएसएलसी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची रस्त्यावरून अत्यंत बेजबाबदारपणे वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार मूडलगी येथे उघडकीस आला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी येथील उमाबाई हायस्कूल केंद्रावर एसएसएलसी इंग्रजी विषयाच्या परीक्षेनंतर हा गंभीर प्रकार घडला. परीक्षा कर्मचारी एस. आर. बेलगली आणि इतर कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कोणत्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय केवळ एका दुचाकीवरून नेण्यात आल्या. नियमानुसार, उत्तरपत्रिकांची वाहतूक अत्यंत कडक सुरक्षेत होणे अपेक्षित असताना, येथील कर्मचारी मात्र सर्वसामान्य जनतेच्या टीकेकडे दुर्लक्ष करून उडवाउडवीची उत्तरे देताना दिसले.

“प्रश्नपत्रिका आणताना जी कडक सुरक्षा पाळली जाते, ती परीक्षा संपल्यावर उत्तरपत्रिका परत नेताना का नाही?” असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. उत्तरपत्रिकांची अत्यंत निष्काळजीपणे वाहतूक करतानाची ही दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली असून, चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याप्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags: