विजापूर जिल्ह्यातील टिकोटा तालुक्यातील कोट्याळ गावात एका मद्यपीने दारूसाठी मोबाईल टॉवरवर चढून जोरदार राडा केला. श्रीशैल असे या व्यक्तीचे नाव असून, तो दारूच्या नशेत टॉवरवर चढल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
कोट्याळ गावातील रहिवासी असलेला श्रीशैल हा मद्यव्यसनी असून, त्याने गेल्या दोन वर्षांतील ही दुसरी वेळ आहे जेव्हा तो अशा प्रकारे टॉवरवर चढला आहे. “मला दारू द्या, तरच मी खाली येईन,” अशी मागणी करत त्याने टॉवरच्या टोकावर जाऊन हुल्लडबाजी सुरू केली. भरवस्तीत सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच टिकोटा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी श्रीशैलची समजूत काढून त्याला सुरक्षितपणे खाली उतरवले. वारंवार अशा प्रकारे हुल्लडबाजी करणाऱ्या या मद्यपीवर आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments