विजापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या वळीव पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

प्रशासनाने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील मसुती गावात एका शेतकऱ्याच्या शेतातील वीज वाहू तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे चंदनाची आणि हेब्बलूची झाडे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी शेतकरी नेते सोमणगौडा बिरादार यांनी केली आहे.
वळीव पावसामुळे द्राक्ष, डाळिंब आणि केळीच्या पिकांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे रीतसर सर्वेक्षण करून बाधित शेतकऱ्यांना शासनाने योग्य मोबदला द्यावा, असे निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी संघटनेने दिला आहे.


Recent Comments