Belagavi

बेळगावात ५ वर्षांनंतर महसूल कर्मचाऱ्यांचा क्रीडा मेळावा

Share

बेळगावच्या जिल्हा क्रीडांगणावर आज महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. सतत फाईलींच्या कामात व्यग्र असलेल्या कर्मचाऱ्यांना विरंगुळा देण्यासाठी आयोजित या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने नेहरू नगर येथील जिल्हा क्रीडांगणावर २०२५-२६ या वर्षासाठीचा महसूल कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव अत्यंत थाटात आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी आकर्षक पथसंचलन करत पाहुण्यांना मानवंदना दिली.

बेळगावच्या प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांनी क्रीडा ध्वजारोहण केले. बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरासे यांनी क्रीडा ज्योतीचे स्वागत केले. त्यानंतर क्रीडा फलकाचे अनावरण करून आणि हवेत फुगे सोडून क्रीडा स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.

यावेळी क्रीडा शपथ देखील देण्यात आली.

यानंतर प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरासे आणि एसपी के. रामराजन यांनी स्वतः वॉलीबॉल खेळून क्रीडा स्पर्धेला सुरुवात केली, जे विशेष आकर्षण ठरले.

उद्घाटनानंतर बोलताना प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी म्हणाल्या की, गेल्या ५ वर्षांनंतर महसूल विभागात क्रीडा स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वांनी खिलाडूवृत्तीने खेळावे. क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचे मी आभार मानते.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भूषवले. जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरासे म्हणाले की, आरोग्य अमूल्य आहे. तणावपूर्ण जीवनात सरकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामासाठी वेळ काढला पाहिजे.

यावेळी पोलीस अधीक्षक के. रामराजन म्हणाले की, खेळातील हार-जीत आपल्याला प्रेरणा देते. कोणतीही तालीम नसताना कर्मचाऱ्यांनी केलेले पथसंचलन कौतुकास्पद आहे. कोविडनंतर पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अशा स्पर्धेचे आयोजन होणे हे सर्व विभागांच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण आहे.

बेळगावचे उपविभागीय अधिकारी श्रावण नायक यांनी स्वागत केले, तर बैलहोंगलचे उपविभागीय अधिकारी प्रवीण जैन यांनी आभार मानले. विविध संघांनी खेळांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला.

Tags: