माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना बेळगाव शहरात उघडकीस आली आहे. ज्या बापाने मुलीचे रक्षण करायचे, त्याच नराधम बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बेळगाव शहरात मोलमजुरी करणाऱ्या एका कुटुंबात हे अमानवीय कृत्य घडले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा नराधम बाप आपल्या अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार करत होता. विशेष म्हणजे, या घृणास्पद कृत्यात पीडितेच्या आईनेच बापाला साथ दिल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. मार्केट पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत नराधम बाप आणि निर्दयी आई या दोघांनाही अटक केली असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या क्रूर कृत्याची माहिती असूनही, मुलीचे रक्षण करण्याऐवजी स्वतःच्या आईनेच पतीला साथ दिल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर मार्केट पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणाचा तपास पूर्ण करून मार्केट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आज शनिवारी दोन्ही आरोपींना बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सार्वजनिक स्तरावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. या नराधम दांपत्याला कठोरत: कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडितेच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत.


Recent Comments