State

बंडखोरी मोडीत काढत समर्थ शिवशंकराप्पांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

Share

दावणगेरे पोटनिवडणुकीच्या तिकीट वाटपावरून पेटलेली बंडाची ठिणगी विझवण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पूर्णपणे यश आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आता येथील चित्र पालटले असून काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दावणगेरे मतदारसंघात उमेदवारीवरून पक्षात प्रचंड अस्वस्थता होती, मात्र दिवंगत आमदारांच्या वारसांना तिकीट देण्याची राजकीय परंपरा आहे आणि त्याच धर्तीवर मल्लिकार्जुन यांचे पुत्र समर्थ यांना उमेदवारी देण्यात आली आहे, असे आज बेंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, कालपर्यंत बंडाचे निशाण फडकवणाऱ्या ११ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

या मतदारसंघात ७० टक्के मतदार हे दावणगेरे शहरात असून त्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाची भूमिका निर्णायक आहे. या समुदायाकडूनही तिकिटाची मागणी होत होती, मात्र हायकमांडने सर्व बाजू तपासून समर्थ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. दावणगेरेसोबतच बागलकोटमध्येही दिवंगत लोकप्रतिनिधींच्या कुटुंबाला न्याय देण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. या यशस्वी ‘डॅमेज कंट्रोल’मुळे आता दावणगेरेची लढाई काँग्रेससाठी एकतर्फी होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Tags: