इराण आणि इस्रायलमधील युद्धाचे परिणाम आता थेट बेळगावच्या गृहिणींच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

बेळगाव तालुक्यातील कडोली सह अनेक गावांमध्ये घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. गॅस एजन्सीसमोर महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लागल्या असून, अनेक तास प्रतीक्षा करूनही सिलिंडर मिळेलच याची खात्री नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, बेळगाव शहरात कमर्शियल गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसमोर देखील समस्या उभ्या राहिल्या आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात असून, ही टंचाई लवकर दूर न झाल्यास सर्वसामान्यांचे हाल अधिक वाढण्याची शक्यता आहे.


Recent Comments