Dharwad

धारवाडमध्ये ‘एल अँड टी’ कार्यालयात नगरसेवकांचा ठिय्या

Share

धारवाड शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी ‘एल अँड टी’ कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली.

शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ‘एल अँड टी’ कंपनीकडून गेल्या अनेक दिवसांपासून नियोजित पाणीपुरवठा होत नसल्याने, संतप्त नगरसेवकांनी थेट कार्यालयात घुसून प्रशासनाचा निषेध केला.

विशेष म्हणजे, या आंदोलनात राजकीय मतभेद बाजूला सारून काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकत्रितपणे सहभागी झाले होते. भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महापालिकेत पाणीपुरवठ्याची जबाबदारी ‘एल अँड टी’ कडे सोपवण्यात आली आहे, मात्र कंपनीकडून तांत्रिक कारणांचे दाखले देत पाणीपुरवठा विस्कळीत ठेवला जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

यावेळी नगरसेवकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले असून, येत्या २४ तासांत परिस्थिती न सुधारल्यास अधिक उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Tags: