विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील मिरगी गावात काल संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या तीन लहान मुलांना विहिरीत फेकून स्वतःही आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
राजश्री शंकरप्पा हल्लूर (२८) असे मृत महिलेचे नाव असून तिने आपली मुले अनुश्री (६), तनू (३) आणि संतोष (१) यांना विहिरीत फेकून स्वतःचे जीवन संपवले. ही घटना घडली तेव्हा राजश्रीचे पती शंकरप्पा गावात नव्हते; ते खासगी बस चालक म्हणून कार्यरत आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विहिरीतून चौघांचेही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी इंडी तालुका रुग्णालयात पाठवले असून त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
या प्रकरणाबाबत पती शंकरप्पा यांनी आपली पत्नीच मुलांच्या मृत्यूला जबाबदार असल्याची तक्रार दिली आहे. दुसरीकडे, राजश्रीच्या माहेरच्या व्यक्तींनी ही आत्महत्येची घटना असल्याचे म्हटले आहे. मालमत्तेशी संबंधित वाद या भीषण घटनेला कारणीभूत असावा, अशी चर्चा गावात सुरू आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


Recent Comments