शाळा सुटल्यानंतर पायी घरी परतणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना एका भरधाव कारने चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका बालिकेचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी बहीण गंभीर जखमी झाली आहे.
रायबाग तालुक्यातील मखळी गावाच्या शिवारात हा भीषण अपघात झाला आहे. शाळेतून घरी परतत असताना जयश्री कोटरे या ११ वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला, तर तिची बहीण भाग्यश्री ही गंभीर जखमी झाली आहे. दोघी बहिणी मखळीमधील अनुदानित सरकारी शाळेत शिकत होत्या. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी बेळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागरमुन्नोळी गावाकडून रायबाग शहराच्या दिशेने जाणाऱ्या कारने या विद्यार्थिनींना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बसरगी आणि रायबाग सीपीआय यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. रायबाग पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत हा अपघात घडला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments