Khanapur

खानापूरमधील हिरे अंग्रोळी ते गंदिगवाड रस्त्याची दुरवस्था

Share

खानापूर तालुक्यातील पूर्व भागातील मुख्य रस्ता सध्या दुरवस्थेत आहे. हिरे अंग्रोळी ते गंदिगवाड दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

खानापूर तालुक्यातील गंदिगवाड आणि मुगळीहाळ गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे उखडला असून वाहनधारकांसाठी तो धोकादायक ठरत आहे. हिरे अंग्रोळी ते गंदिगवाड पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून खडी बाहेर आली आहे. दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावरून प्रवास करणे आता जिकिरीचे झाले आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

या परिस्थितीवर कर्नाटक राज्य सीमावर्ती हितरक्षण वेदिकेचे सरचिटणीस एम. एम. राजीबाई आणि नेगील योगी राज्य शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित आमदार आणि अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरून प्रवास करून जनतेचे हाल पाहावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. रस्ते दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले नाही, तर उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रवी पाटील यांनी दिला आहे.

Tags: