बागलकोट पोटनिवडणुकीचे रणमैदान आता पूर्णपणे तापले आहे. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता काँग्रेस नेत्यांनी अधिकृतपणे प्रचाराचा नारळ फोडला असून, जिल्हा पालकमंत्री आर.बी. तिम्मापूर यांच्या नेतृत्वाखाली मतदारांना आपलेसे करण्याची जोरदार कसरत सुरू झाली आहे.

बागलकोट पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात कमालीची हालचाल वाढली आहे. मंत्री तिम्मापूर यांनी आज शहरातील विद्यागिरी आणि बीटीडीए (BTDA) परिसरामध्ये घरोघरी जाऊन प्रत्यक्ष प्रचार केला. यावेळी स्थानिक महिलांनी मंत्र्यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून उत्स्फूर्त स्वागत केले. बीटीडीए अध्यक्ष प्रकाश तपशेट्टी यांनीही मंत्र्यांच्या सोबत राहून सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली.

प्रचाराच्या दुसऱ्या आघाडीवर बायक्का मेटी, संतोष होक्राणी आणि मल्लिकार्जुन मेटी यांच्या चमूने शेकडो कार्यकर्त्यांसह संपूर्ण मतदारसंघात रॅली काढली. या रॅली दरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. हातामध्ये पक्षाचे झेंडे घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते घराघरांत पोहोचत असून, आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी विरोधकांना तगडे आव्हान देत आहेत.


Recent Comments