BENGALURU

बेंगळुरूमध्ये अंगणवाडी सेविकांचे आंदोलन मागे

Share

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. बेंगळुरू येथील फ्रीडम पार्कवर विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते.

या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करणे, अंगणवाड्यांमध्ये एलकेजी, यूकेजी सुरू करणे आणि इतर मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

सरकारला अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रश्नांची पूर्ण जाणीव असून त्यांच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. मी सर्वांच्या हितरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या बैठकीला विभागाच्या सचिव डॉ. शामला इक्बाल, संचालक महेश बाबू, संघटनेच्या अध्यक्षा वरलक्ष्मी, कार्याध्यक्षा शांता घंटी आणि सरचिटणीस एच. एस. सुनंदा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: